चारचाकी वाहने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या परराज्यातील टोळीचा निझापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुजरात राज्यातील तीन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदवे गावातील फिर्यादी दिनेश सदाशिव महाले यांची संशयितांनी फसवणूक केली. संशयितांनी फिर्यादी यांच्याकडून मारुती सुझुकी कंपनीची अर्टिगा कार (क्र. GJ-15-CG-4590) गहाण ठेवून ३ लाख १९ हजार रुपयांचे गहाणखत करून दिले. मात्र, त्यानंतर फिर्यादीला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांचे वाहन घराच्या अंगणातून लंपास केले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाले यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बीएनएस कलम ३१६(५) व ३१८(४) नुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मयुर भामरे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्रावून फिरवली. या तपासात गुजरात राज्यातील आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी थेट गुजरात गाठून खालील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या:१. सुरेंद्रभाई ईश्वरभाई पटेल (रा. नवसारी, गुजरात)२. प्रदीपभाई दशरथभाई पटेल (रा. नवसारी, गुजरात)३. जितेनभाई मनुभाई पटेल (रा. वलसाड, गुजरात).
पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे. ७ लाख रुपये किमतीची मारुती अर्टिगा कार (क्र. GJ-15-CG-4590)गुन्ह्यात वापरलेली २ लाख रुपये किमतीची मारुती वॅगनआर कार (क्र. GJ-21-CA-1442)एकूण मुद्देमाल: ९,००,०००/- रुपये.न्यायालयाने आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या टोळीने अशाच प्रकारे अजून किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे , उपविभागीय पोलीस अधिकारी एस.आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि मयुर भामरे आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी प्रियदर्शनी थोरात, मधुकर सोमासे, यशवंत भामरे, रुपसिंग वळवी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

