धुळे शहर पोलिसांची मोठी कारवाई
धुळे जिल्हा कारागृहातून फरार झालेल्या एका शिक्षाबंदी कैद्याला धुळे शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत नाशिक जिल्ह्यातून शिताफीने अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली असून, आरोपीला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.
भिकन नजीर पिंजारी (वय ५४, रा. इस्लामपुरा पिंपळगाव ब., ता. निफाड, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भिकन हा धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास कारागृहाच्या शेती विभागात काम करत असताना, रक्षकांच्या नजरचुकीचा फायदा घेऊन तो पसार झाला होता. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून धुळे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपास अधिकारी मिलिंद नवगिरे यांनी कारागृहातील रेकॉर्डवरून आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवला.या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले असता, आरोपीचे लोकेशन नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात असल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने पिंपळगाव बसवंत गाठले आणि ६ मार्च रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कमी वेळात आरोपीचा शोध घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

