धुळ्यातील सोनगीर टोलनाक्याजवळ पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात २ आरोपी अडकले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे, मोबाईल आणि पल्सर मोटारसायकल असा १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम पवार यांनी अवैध शास्त्रांच्या शोधासाठी, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोनगीर टोलनाक्याजवळ सापळा रचला. शिरपूर कडून धुळ्याला येणाऱ्या मार्गावर मोटारसायकलहुन येणाऱ्या २ तरुणांचा वाजवी संशय आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विना परवाना गावठी बनावटीचे पिस्टल मॅग्झिनसह आणि २ जिवंत काडतुसे मिळाली. चेतन जीवन पावरा आणि युवराज बापू शिरसाठ हे दोन्ही १९ वर्षीय तरुण , राहणार नगावबारी , हे त्यांचा मित्र भावेश जोशी राहणार एकतानगर देवपूर धुळे याच्या सांगण्यावरून एका इसमाकडून पिस्टल आणि काडतुसे घेऊन भावेशकडे घेऊन जात होते . या तिघांविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे, मोबाईल आणि पल्सर मोटारसायकल असा १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी भावेश मिलिंद जोशी ह्याच्यावर अगोदरच चाळीसगावरोड आणि देवपूर पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे , अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी , पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे, पवन गवळी, आरिफ पठाण, देवेंद्र ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील ह्यांनी केली.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे
झेप मराठी धुळे.