धुळे: भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या पावन प्रसंगी, जीतो लेडीज विंग धुळे आणि नवकार मंडळ संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ मोठ्या भक्तिभावाने ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती साक्री रोड येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या आध्यात्मिक कार्यक्रमाचा भव्य प्रारंभ ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजून १ मिनिटांनी होणार असून ९ वाजून ३६ मिनिटांपर्यंत सामूहिकरित्या नवकार महामंत्राचा जप करण्यात येईल. धुळ्यातील मुख्य कार्यक्रम हिरॆ भवन, स्टेशन रोड येथे संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ स्थानिक मर्यादेत सीमित न राहता, संपूर्ण जगभरात एकाच वेळी नवकार महामंत्राचा निनाद होणार आहे. भारतासह १०८ देशांतील लाखो श्रद्धावान नागरिक सकाळी ८:०१ वाजता एकत्र येऊन सामूहिक जपात सहभागी होणार आहेत. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश जागतिक शांतता, सहिष्णुता व मानवतेचा संदेश जगभर प्रसारित करणे हा आहे.
नवकार महामंत्र जैन धर्मातील सर्वात पवित्र मंत्र असून तो आत्मशुद्धी, मानसिक शांती आणि अहिंसा यांचे प्रतीक मानला जातो. चैत्र महिन्यात या मंत्राचा जप अधिक प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच भगवान महावीर स्वामींच्या जन्मकल्याणक निमित्त या मंत्रजपाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्तिक सोनवणे
धुळे