सातारा : सातारा शहर पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून पसार झालेल्या आरोपींना शिरपूर पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून अटक केली असून त्यांच्या ताब्यातून अंदाजे २१ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरातील सोन्याचे व्यापारी कोमल परिहार यांच्या ताब्यातील सुमारे २२ तोळे सोन्यावर पाच अज्ञात आरोपींनी दरोडा टाकला. दरोडा टाकल्यानंतर आरोपी पांढऱ्या रंगाच्या विनानंबर स्विफ्ट कारमधून साताऱ्यातून मध्य प्रदेशच्या दिशेने फरार झाले होते.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ नाकाबंदी लावून संशयित वाहनांचा शोध सुरू केला. यामध्ये पोहवा राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, मनोज महाजन, सचिन वाघ, भटु साळुंके आणि विजय पाटील यांनी सहभाग घेतला.दरम्यान आरोपींनी टोल नाका टाळून शिरपूर शहरातील अंतर्गत रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना एक संशयित स्विफ्ट कार दिसून आली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी वेग वाढवत पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून वाहन अडवून पाच संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —अभिषेक सुरेंद्र शिकलबार (वय १९), अंकुश जाट (वय १९), अनुज रामाधर दिवाकर (वय १९), पंकज केदार राठोड (वय १९), अजय फौजदा राठोड (वय २१)सर्व रा. गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.आरोपींच्या ताब्यातून अंदाजे २१ तोळे सोने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोठा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला आहे.
( प्रतिनिधी : समाधान ठाकरे दोंडाईचा )

