गावपातळीला जाऊन शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजनांची माहिती पोहोचवा, जिल्हाधिकार्यांचे निर्देश

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावपातळीवर जनजागृतीद्वारे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कृषी विभागाच्या योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.सी. चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेश नांद्रे यांच्यासह इतर विभागीय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत कृषी समृद्धी योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, आदर्शगाव योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, पिकांवरील किड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजनेत धुळे जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांचा सहभाग कमी असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी १४ ऑगस्ट आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत केंद्र शासनाने विशेष मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा वेळेत काढावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

शासनाने निश्चित केलेल्या योजना तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी विसपुते यांनी दिले.यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती उपस्थितांना सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top