सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) नंदुरबार येथील उपअभियंता नितीन इंगळे (वय ५१) यांना ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांच्या फर्मच्या नावाने सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत), धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील २८ गावांमध्ये स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम मंजूर झाले होते. सुमारे २ कोटी ३७ लाख रुपयांच्या निविदेचे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात आले होते.
या कामापोटी मार्च २०२५ मध्ये तक्रारदारांना ४१ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते, तर उर्वरित रक्कम मंजुरीच्या प्रक्रियेत होती. उर्वरित बिल अदा करण्यासाठी उपअभियंता नितीन इंगळे यांनी सुरुवातीला ८० हजार रुपयांची लाच मागितली, तसेच उर्वरित ३० हजार रुपये नंतर द्यावे लागतील, असे तक्रारदारांना सांगितले होते.
यानंतर तक्रारदारांच्या बँक खात्यात एकूण २ कोटी २ लाख ५ हजार ५२५ रुपये जमा करण्यात आले. मात्र पुढील देयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी उपअभियंत्याने ८ लाख रुपयांची मोठी लाच मागितली. पैसे दिल्याशिवाय पुढील बिलांवर सह्या करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या प्रकारामुळे कंटाळून तक्रारदारांनी २० जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर २७ जानेवारी २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपी उपअभियंत्याने ८ लाख रुपयांची तडजोडीअंती लाच स्वीकारण्यास मान्यता दिली.
अखेर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून ८ लाख रुपये स्वीकारताना उपअभियंता नितीन इंगळे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सचिन साठे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले. कारवाईत विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा खाजगी दलाल यांनी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे संपर्क साधावा.
-प्रतिनिधी समाधान ठाकरे

