साक्री तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका अँड. पूनम काकूस्ते (शिंदे) यांची भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.
ही निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, धुळे जिल्हा पालक मंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, आमदार अनुप अग्रवाल, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी जयश्री अहिरराव, धुळे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा धरती देवरे, आणि माजी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
अँड. पूनम काकूस्ते या विद्यार्थी अवस्थेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील सक्रिय सदस्य आहेत. स्त्री शक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात आणि शहरात महिलांचे संघटन उभारले आहे. २०१५ मध्ये साक्री नगरपंचायतीची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवून विजयी झाल्यानंतर त्यांनी सामान्य कार्यकर्ताही प्रामाणिक कामगिरीने जिंकू शकतो हे सिद्ध केले. नगरपंचायतीत एकमेव विरोधी सदस्य असतानाही त्यांनी प्रखर भूमिका मांडली व प्रभागातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले.
या कार्यशैलीमुळे २०२२ च्या निवडणुकीत साक्री नगरपंचायतीत भारतीय जनता पक्ष बहुमताने निवडून आला. मागील साडेतीन वर्षांपासून त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती होती. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामामुळे साक्री तालुक्यातील महिला मतदार आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निवड झाल्याबद्दल अँड. पूनम काकूस्ते-शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले असून, साक्री तालुक्यात महिला संघटन अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रतिनिधी निलेश सावळे
साक्री

