दोंडाईचा (दि. ७) – शहादा रस्त्यावर निमगूळ-टाकरखेडा दरम्यान एसटी बस व दुचाकीचा झालेल्या भीषण अपघातात मांडळ (ता. शिंदखेडा) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा आगाराची एमएच 20 बीएल 3330 क्रमांकाची बस दोंडाईचा कडून शहाद्याकडे जात होती. त्याच वेळी, एमएच 18 एयू 4307 क्रमांकाची दुचाकी घेऊन पावभा मंगल भील (वय २२) व मंगल आसाराम भील (वय २३, दोघे रा. मांडळ) शहादा कडून दोंडाईचा कडे येत होते. दरम्यान, निमगूळजवळ बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघेही तरुण गंभीर जखमी झाले.
स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. अवनी पाटील यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, आसाराम मुलचंद भील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील महाजन करीत आहेत.
या घटनेमुळे मांडळ गावात शोककळा पसरली असून, दोन्ही कर्त्या तरुणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-प्रतिनिधी समाधान ठाकरे

