दोंडाईच्यात मोबाईल चोर गजाआड; ३० मोबाईल जप्त

दोंडाईचा – पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोराला अटक करून त्याच्याकडून तब्बल ३० मोबाईल हस्तगत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे ३ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मोबाईल चोरी व रेल्वेमध्ये मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोंडाईचा शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

प्रभारी अधिकारी दिनेश सोनवणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, राजपथ रस्त्यावर एक संशयित मोबाईल विक्रीसाठी ग्राहक शोधत आहे. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई केली. संशयितास ताब्यात घेतले असता त्याचे नाव शंकर बन्सी ठाकरे (रा. टेकभिलाटी, दोंडाईचा) असे समोर आले. त्याची बॅग तपासली असता विविध कंपन्यांचे एकूण ३० मोबाईल आढळून आले.

जप्त केलेल्या मोबाईलमध्ये सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, टेक्नो आदी कंपन्यांचे मोबाईल असून त्यातील एक मोबाईल दोंडाईचा बसस्थानक येथील दाखल गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी कमलेश अडगळे यांचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आरोपीकडून मिळाला आहे.

या प्रकरणी आरोपी शंकर ठाकरे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोसई नकुल कुमावत करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

-प्रतिनिधी समाधान ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top