धुळे : निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्यांवर पोलिसांनी छापे टाकत तब्बल ₹२,६६,०००/- किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईत तिघा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, स्वतःच्या शेतात भट्टी लावण्यास मदत करणारा शेतकरीही आरोपी म्हणून पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
११ सप्टेंबर रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गबुर भामरे यांच्या पथकाने पेटले, छडवेल व विटावे परिसरात छापे घातले. काटेरी झुडपांमध्ये, घराच्या आडोशाला तसेच शेताच्या बांधात लपवून ठेवलेले गावठी हातभट्टीचे साहित्य पोलिसांनी नष्ट केले.
या कारवाईत –
गुन्हा क्र. ०२४१/२०२५ : पेटले येथील सुपु नवल भिल (५५) याच्याकडून ₹८८,०००/- किमतीचा मुद्देमाल.
गुन्हा क्र. ०२४२/२०२५ : छडवेल येथील शेतकरी किशोर विश्वास बेडसे व त्याचा साथीदार परशुराम कोतवाल यांच्याकडून मोबाईल व गाळणी साहित्यांसह एकूण ₹१,६३,०००/- किमतीचा मुद्देमाल.
गुन्हा क्र. ०२४३/२०२५ : विटावे येथील दिलावर पंडीत अहिरे (३५) याच्याकडून ₹१५,०००/- किमतीचा मुद्देमाल.
एकूण ₹२,६६,०००/- किमतीचा माल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
या कारवाईसंदर्भात निजामपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मा. मयूर भामरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “आपल्या शेतात कोणत्याही आरोपींना गावठी हातभट्टीसाठी जागा अथवा सहकार्य देऊ नये. अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
ही संपूर्ण कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देबरे व उपविभागीय अधिकारी एस. आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
-प्रतिनिधी हेमंत महाले

