धुळ्यात तरुणाचा खून; जुन्या वादातून चार आरोपींवर गुन्हा दाखल

धुळे शहरातील दक्षता कॉलनी परिसरात जुन्या किरकोळ वादातून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेतले आहे तर तिघांचा शोध सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव तेजस गणेश महिराळे (वय २०, रा. दक्षता कॉलनी, गोळीबार टेकडी रोड, धुळे) असे आहे. फिर्यादी गणेश महिराळे (वडील) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास, घरासमोर अंगणात बसले असताना आरोपींनी संगनमताने हल्ला केला.

आरोपींमध्ये हर्षल विभांडीक (ताब्यात), अनुराग किरण जगताप, मयूर किरण जगताप आणि हर्षल काशिनाथ खैरनार (सर्व रा. दक्षता कॉलनी, धुळे) यांचा समावेश आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी तेजसवर हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच, हातपाय पकडून अंगणातील ओट्यावर आपटले. यात गंभीर दुखापत झाल्याने तेजसला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद (A.D.) करण्यात आली होती. परंतु, वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम १०३(१), ३(५), अ.जा.जा.क.क. ३(२)(५) प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top