धुळे जिल्हा पोलिस दलात मोठी कारवाई झाली असून जवळपास २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल गहाळ केल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पूर्वी कार्यरत असलेल्या दोन पोलीस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही कारवाई केली असून निलंबित हवालदारांची नावे महेंद्र जाधव आणि शरद ठाकरे अशी आहेत.
मुद्देमाल जमा करण्याबाबत वरिष्ठांनी दोघांना अनेकदा ताकीद दिली होती. पुरेसा वेळ देऊनही त्यांनी मुद्देमाल सादर केला नाही. त्यांच्या वारंवार चौकशी करण्यात आली, मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कठोर निर्णय घेण्यात आला.
काही वर्षांपूर्वीच्या प्रकरणांशी संबंधित असलेला हा मुद्देमाल अलिकडील अंतर्गत तपासणीत पुन्हा उघडकीस आला. तपासादरम्यान विविध गुन्ह्यांतील जप्त वस्तू न्यायालयात वेळेत सादर न केल्याचे आढळले. तसेच काही प्रकरणांत महत्त्वाचा आणि किमती मुद्देमाल पूर्णपणे गहाळ झाल्याचे लक्षात आले.
या गंभीर घटनाची प्रशासकीय स्तरावर दखल घेण्यात आली असून दोन्ही हवालदारांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच या दोघांवर निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

