दोंडाईचा पोलिसांनी रात्रीच्या पेट्रोलिंगदरम्यान एक संशयिताला पाठलाग करून ताब्यात घेतले. ३ डिसेंबर २०२५ रोजी पोसई नकुल कुमावत, अंमलदार नरेंद्र शिरसाठ, भटू पाटील आणि प्रवीण निकुंभे हे शहरात गस्त घालत असताना बसस्थानकाजवळ एका मोटारसायकलस्वाराने पोलिसांना पाहताच मोटारसायकल रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला.
पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्याला पकडले. चौकशीअंती त्याने आपले नाव विष्णू किसन वळवी (रा. म्हसल्ल्या मारुतीनगर, दोंडाईचा) असे सांगितले. त्याच्या वर्तनावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची मोटारसायकल आणि अंगझडती घेतली असता, डिकीतून एक कोयता आढळून आला.
तपासात उघड झाले की सदर मोटारसायकल शहादा येथून चोरीस गेलेली असून शहादा पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपीला दोंडाईचा पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा क्रमांक ३०६/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२(अ) अंतर्गत अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.
-प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

