दोंडाईचा : घरफोडी प्रकरणातील चार आरोपी जेरबंद; पोलिसांनी ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

दोंडाईचा शहरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि दोंडाईचा पोलीस ठाण्याने अतिशय जलदगतीने तपास करून उलगडा केला आहे. २५ नोव्हेंबरच्या रात्री ते २६ नोव्हेंबरच्या सकाळी भगवती इंजिनिअरिंग बके शॉप या दुकानाचे शटर उचकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील विविध साहित्य चोरी केले होते. या घटनेची नोंद दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये भाग-५ गुन्हा क्रमांक ३०७/२०२५, BNS 305 (अ) आणि 331 (4) प्रमाणे करण्यात आली होती.

गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ५ डिसेंबर रोजी दोंडाईचा शहरातून दोन तरुण आरोपी आणि दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

ताब्यात घेतलेल्या आरोपींत सनी उर्फ जग्गू दिलीप चौधरी (वय १८, रा. आदर्श नगर, दोंडाईचा) आणि प्रकाश नामदेव भोई (वय १८, रा. महादेवपूर, दोंडाईचा) या दोघांचा समावेश असून, दोन विधी संघर्षित बालकही या गुन्ह्यात सहभागी होते. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केलेला ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला.

हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालात शेतकऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या चार मोटारी, गॅस कटर तसेच पाण्याच्या पाच मोटारींचा समावेश आहे. सर्व वस्तूंची एकत्रित किंमत ४८ हजार रुपये इतकी आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास आणि अटकेत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सोनवणे, सपोनि कृष्ण पारधी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये इमान खान, संजय पाटील, प्रशांत चौधरी, चेतन चोरसे, संतोष हिरे, कैलास महाजन, विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, हर्षल चौधरी, हिरालाल सूर्यवंशी आणि प्रविण निकुंभे यांनी मोलाची भूमिका बजावली.

पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे व्यापारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top