ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम — नववधूस “माहेरची साडी” भेट देत संस्कारांची नवी परंपरा

धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक ग्रामपंचायतीकडून समाजाच्या संस्कारांचे दर्शन घडवणारा एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. गावातील मुलगी लग्नानंतर सासरी जात असताना तिच्या हातात माहेरची आठवण म्हणून “माहेरची साडी” देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायतीतर्फे सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात गावातील नववधू—संदीप दौलत शेवाळे आणि कारभारी लकडू सूर्यवंशी यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी करण्यात आली.

लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब गुलाब देवरे यांच्या हस्ते नववधूस ही साडी भेट देण्यात आली. गावातील प्रत्येक मुलगी ही गावाची शान आहे आणि तिच्या आनंदात गावाचीही भागीदारी असावी, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. नववधूला गावाकडून प्रेम, आपुलकी आणि संस्कारांची शिदोरी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. ग्रामस्थांनी या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गावभर या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन नववधूच्या आनंदात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. संदीप शेवाळे आणि कारभारी सूर्यवंशी यांनी या भावनिक उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. गावाला नाव मिळवून देणारी, संस्कारांची ओळख निर्माण करणारी अशी ही अनोखी परंपरा आता रुजत असून समाजहिताचा पायंडा पाडणारी ठरत आहे. गावातील प्रत्येक विवाहसोहळ्यात ही परंपरा पुढे नेण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.

-प्रतिनिधी तुषार देवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top