१० दिवसांच्या प्रशिक्षणात दिडशेवर विद्यार्थ्यांचा सहभाग
महाराष्ट्र नवनिर्माण सेना साक्री तालुका आणि प्रशिक्षक वस्ताद प्रमोद पाटील यांच्या क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसांचे शिवकालीन युद्ध कला अर्थात लाठी-काठी, दांडपट्टा व तलवार या शस्त्रांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. शिबिराला काल दि.११ तारखेपासून येथील क्रिडा संकुलात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
शिबिराचे औपचारिक उद्घाटन साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक वस्ताद प्रमोद पाटील, सहप्रशिक्षक सुमित तांबवेकर,अम्रूता पाटील, श्रीमती रंजना प्रकाश देसले, मनसेचे धीरज देसले यांची प्रमुख उपस्थिती होते .दि.११ ते २० डिसेंबर या दहा दिवसाच्या कालावधीत सदर शिबीर होणार असून यात सुमारे दीडशेवर शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महिलांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या शिबिरात कोल्हापुर येथील क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाड्याचे संस्थापक तथा शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षक वस्ताद प्रमोद पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रशिक्षणार्थींना शिवकालीन युद्ध कलेचे यात लाठी काठी, दांडपट्टा आणि तलवारबाजीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणार आहेत. साक्री तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून होत असलेल्या या युद्ध कला प्रशिक्षणाला पालकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. अनेक पालकांनी आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या. आजकालच्या युगात शास्त्रासोबत शस्त्राचे देखील लहान वयातच प्रशिक्षण मिळाल्यास बालकांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.
दहा दिवस चालणाऱ्या या युद्ध कला प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धीरज देसले, योगेश दाभाडे- पाटील, कार्तिक रामोळे आणि मनसे सैनिकांनी केले आहे. तर त्यांना साक्री तालुका क्रिडा संकुलातील प्रशिक्षक आणि सहकारी यांची मदत होते आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जगदीश शिंदे यांनी मानलेत. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर येथील प्रशिक्षकांनी युद्ध कलेची काही ठराविक प्रात्यक्षिक यावेळी उपस्थितांसमोर सादर केली. उपस्थितांनी सदर प्रशिक्षकांना मोठ्या प्रमाणात दाद देत, येत्या दहा दिवसात निश्चितच शिबिरार्थींना चांगले कौशल्य आत्मसात करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त करून दिली असल्याची भावना आयोजकांकडे व्यक्त केली.
( प्रतिनिधी : निलेश सावळे )

