कामराज निकमांसह दिग्गज पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच धुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील शरद पवार गटाचे बडे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जयकुमार रावल यांचे विरोधक कामराज निकम यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतल्याचे निकम यांनी सांगितले असून, त्यांच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाची शिंदखेडा तालुक्यातील ताकद घटली आहे. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार गटाने धुळे जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात कामराज निकम यांच्यासोबत तालुकाध्यक्ष दीपक जगताप, महेंद्र निकम, अरुण सोनवणे आणि डॉ. नितीन चौधरी यांसारख्या दिग्गज पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पूर्ण ताकदीनिशी स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याचे संकेत यावेळी निकम यांनी दिले. लवकरच शिंदखेडा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन अजितदादांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पक्षबदलामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांच्या गणितात मोठे फेरबदल होणार असून, महायुतीची विशेषत: अजित पवार गटाची बाजू शिंदखेडा मतदारसंघात अधिक भक्कम झाली आहे.

