निवडणूकीसाठी पोलिसांची विशेष मोहीम
धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आलं आहे. शहरात ज्यांच्या नावावर 10 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे आहेत, अशा सराईत गुन्हेगारांची अर्थात हिस्ट्रीशिटर्सची आज पोलीस अधीक्षक कार्यालयात थेट हजेरी घेऊन त्यांची कसून झाडाझडती घेण्यात आली. निवडणुकीच्या काळात कोणीही दादागिरी केली किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर थेट ‘मोक्का’, ‘एमपीडीए’ आणि तडीपारीसारखी कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच पोलिसांनी भरला आहे. केवळ जमिनीवरच नाही, तर सोशल मीडियावरही अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर असणार आहे, त्यामुळे निवडणुकीत विघ्न आणणाऱ्यांची आता खैर नाही, असा स्पष्ट संदेशच धुळे पोलिसांनी दिला आहे.

