शासन व लोकप्रतिनिधींच्या निष्काळाजीपणा मुळे  नागरिकांचा लोकसहभागातून एल्गार…

बेहेड ,नांदवण ,भाडणे हा रस्ता आज केवळ रस्ता न राहता शासनाच्या निष्क्रियतेचे, उदासीनतेचे तसेच संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अपयशाचे जिवंत प्रतीक बनला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (PMGSY) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचा कार्यकाळ सन 2023 मध्येच संपुष्टात आला. मात्र त्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एकही ठोस पाऊल उचलले गेले नाही, ही बाब अत्यंत संतापजनक आहे.

आज या रस्त्यावर ठिकठिकाणी प्रचंड खोल व जीवघेणे खड्डे पडले असून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना तब्बल 45 मिनिटे खर्च करावी लागत आहेत. रुग्णवाहिका अडतात, विद्यार्थ्यांचे शिक्षण खोळंबते, शेतकऱ्यांचा माल वेळेत बाजारात पोहोचत नाही आणि सामान्य नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात येतो. तरीसुद्धा संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना याची कोणतीही काळजी नाही, हे प्रकर्षाने लक्षात येत  आहे. या गंभीर परिस्थितीचा जाब विचारण्यासाठी काटवान भागातील जागरूक नागरिकांनी धुळे येथील PMGSY कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले. मात्र “नवीन रस्ता कधी होईल, सांगता येत नाही”, “अनिश्चित कालावधी लागेल” अशी उत्तरे देत जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नावर ठोस पाठपुरावा न केल्यामुळे प्रशासनाची ही हतबलता व बेजबाबदारपणा अधिकच ठळकपणे समोर आला आहे. जनतेच्या जीवाशी खेळ होत असताना ही भूमिका अत्यंत संतापजनक आहे.

विकासकामांसाठी निधी मंजुरी, पाठपुरावा व शासनावर दबाव टाकणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. मात्र या रस्त्याच्या बाबतीत संबंधित लोकप्रतिनिधींचे मौन व उदासीनता ही देखील तितकीच जबाबदार ठरत आहे, अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे.शासन व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्यानंतर आता नागरिकांनी स्वतः पुढे येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे काटवान भागातील नागरिकांनी जल आक्रोश शेतकरी आंदोलन समिती, काटवान यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून रस्ता दुरुस्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी या कामाचा प्रारंभिक टप्पा म्हणून साईड पट्टी भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.लोकसहभागातून सुरू झालेले हे काम म्हणजे शासनासह लोकप्रतिनिधींनाही दिलेला थेट, ठाम आणि जाहीर इशारा आहे.“जर शासन आणि लोकप्रतिनिधी दोघेही कर्तव्य बजावणार नसतील, तर जनता स्वतः आपला रस्ता बनवेल” हा संदेश या कृतीतून स्पष्टपणे दिला गेला आहे. ही केवळ रस्ता दुरुस्ती नाही, तर प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या असंवेदनशीलतेविरोधातील जनआक्रोशाची ठोस अभिव्यक्ती आहे.काटवान भागातील नागरिकांनी उचललेला हा लढा सर्वसामान्यांच्या सहकार्याने, एकजुटीने आणि निर्धाराने पूर्ण होईल, यात कोणतीही शंका नाही. मात्र भविष्यात या रस्त्यावर एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणा, प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींवरच राहील, असा ठाम इशाराही नागरिकांनी दिला आहे.

( प्रतिनिधी : निलेश सावळे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top