मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली पहिली आढावा बैठक
मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन यंदा बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस.एम. देशमुख यांनी केली आहे. अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगाने झालेली पहिली आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
ही महत्वपूर्ण बैठक शेगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन पार पडली. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ, अनिल उंबरकर यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत, राजेश डीखोळकर, गणेश चौकशे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत श्री. देशमुख सरांनी अधिवेशनाची रूपरेषा मांडत यशस्वी आयोजनाचे आव्हान उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. याला सकारात्मक प्रतिसाद देत शेगाव येथील पदाधिकारी राजेश चौधरी, धनराज ससाने, नंदू कुलकर्णी आणि अनिल उंबरकर यांनी तन-मन-धनाने सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी बुलढाणा जिल्हा अधिवेशनासाठी पूर्णपणे सज्ज असून जबाबदारीने कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. तर प्रदेश सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांनी कोणतीही अडचण उद्भवल्यास ती तत्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले. अधिवेशनाच्या नियमित आढाव्यासाठी श्री. नाईकवाडे व अनिल वाघमारे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये परिषदेच्या शाखा स्थापन झाल्याचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांनी सांगितले. या शाखांतील पदाधिकारी विविध समित्यांमधून अधिवेशनात सक्रिय सहभाग घेणार आहेत.
या बैठकीच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. श्री. एस.एम. देशमुख सर, सौ. शोभना देशमुख, सुरेश नाईकवाडे, चंद्रकांत बर्दे, अनिल वाघमारे यांचा सत्कार शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने नंदू कुलकर्णी, संजय त्रिवेदी, राजकुमार व्यास, मंगेश ढोले, नारायण दाभाडे आदींनी केला.
युवा क्रांती न्यूजचे संपादक विजय यादव यांनी विशेष सन्मान म्हणून श्री संत गजानन महाराजांची प्रतिमा व भगवा दुपट्टा भेट देऊन उपस्थित मान्यवरांचा गौरव केला. बैठकीस खामगाव, संग्रामपूर, शेगाव, घाटाखालच्या तालुक्यांतील शाखा पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. बैठकीचे संचालन प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन घरडे यांनी मानले.
मराठी पत्रकार परिषदेचे हे राष्ट्रीय अधिवेशन शेगाव नगरीत उत्तम आणि भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वास सर्वच पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
