जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी अवकाळी पावसामुळे पिकांबरोबरच घरांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली असून झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे. अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनास दिल्यात.

जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाबरोबर गारपीटीमुळे साक्री व शिरपूर तालुक्यासह इतर ठिकाणीही शेत पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये रस्त्यांवर झाडे व वीज तारा पडल्याच्या तक्रारी असून, अशा ठिकाणी तातडीने झाडे हटवून रस्ते मोकळे करावेत. तसेच वीज तारा दुरुस्त करून खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा, वादळी पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसानीचे स्वयंस्पष्ट पंचनामे करावेत.

महसूल, कृषी, पशुसंवर्धन, वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करुन सर्व नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. कुणीही नुकसानग्रस्त पंचानामा न झाल्याने मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचानामे पूर्ण करुन मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top