जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात 1 मे पासून माहिती व जनसंपर्क भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित झाल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष हा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीत जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मंत्रालयात जावे लागते. रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या दूरदृष्टीतून रुग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष स्थापनेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या कक्षाच्या नियमित व दैनंदिन कामकाजासाठी राज्य शासनाच्यावतीने वैद्यकीय अधिकारी तथा कक्ष अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, लघुलेखक तथा सदस्य प्रमोद बागुल, सामाजिक वैद्यकीय अधिक्षक तथा सदस्य कपिल पिवाल यांची नियुक्ती केली आहे. तरी धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अध्यक्ष डॉ. पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनेचा उद्देश :
✅ रुग्ण व नातेवाईकांना अर्ज करण्यासाठी मदत करणे.
✅ प्राप्त अर्जाची सद्यस्थिती उपलब्ध करणे.
✅ रुग्णांच्या समस्यांचे निराकरण करणे.
✅ आर्थिक मदत मिळालेल्या रुग्णांची रुग्णालयात भेट घेणे.
✅ कक्षाबाबत जनजागृती करणे.
✅ अर्थ सहाय्यासाठी आजाराचे पुर्नविलोकन करणे.
✅ आपत्तीग्रस्त ठिकाणी भेटी देणे.
✅ देणग्यांचा ओघ वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
✅ अर्थसहाय्याच्या, आजाराच्या संख्येत वाढीसाठी प्रयत्न करणे.
या कक्षाचा रुग्णांना होणारा फायदा :
✅ अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध होणार.
✅ संलग्न रुग्णालयांची यादी मिळणार.
✅ अर्ज आणि पाठपुराव्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही.
✅ अर्ज स्थिती आता जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात समजणार.
हा कक्ष गरजू रुग्णांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे, ज्यामुळे आरोग्यसेवा आता अधिक सुलभ होणार आहे.