मागील आठवड्यात काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने ७ मे रोजी मोठं पाऊल उचलत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या कारवाईत पाकिस्तानातील नऊ ठिकाणी हवाई हल्ले करून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण आहे, आणि त्यामुळे देशभरातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा ५ मे रोजी विवाह पार पडला होता. पण लग्नाच्या फक्त तीन दिवसांनी, म्हणजेच ८ मे रोजी, त्यांना तातडीने सीमेवर रुजू होण्याचा आदेश मिळाला. हळदीचा रंग अजून अंगावर होता, हातावरची मेहंदीही कोरडी झाली नव्हती… पण मनोज यांनी देशसेवेसाठी आपल्या अर्धांगिनीला धीर देत, कर्तव्यासाठी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पाचोऱ्यात झालेल्या विवाह सोहळ्यात अजून घरच्यांचा आनंद ओसरला नव्हता, आणि तोच देशसेवेचा आदेश आल्याने मनोजने कुठलाही विचार न करता पुन्हा वर्दीत परतण्याचं ठरवलं. त्यांच्या या निर्णयाचं संपूर्ण गावात आणि परिसरात भरभरून कौतुक होत आहे.
मनोज यांची पत्नी यामिनी यांनीही या कठीण क्षणी पूर्ण समजूत दाखवत, “देश सेवा सर्वांत महत्त्वाची आहे,” असं म्हटलं आहे. गावातील नागरिकांनी अभिमानाने सांगितलं – “मनोज आमच्या गावाची शान आहे. आमचा जवान एक नव्हे, दहा पाकिस्तानींना ठार करून परत येईल!” अशा वीर जवानांच्या त्यागामुळेच देश सुरक्षित आहे आणि मनोज पाटील यांच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ सैनिकांचे धाडस साऱ्यांना प्रेरणा देत आहे.