मुख्यमंत्री सहायता कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज 12 मे रोजी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मंत्रालयात जावे लागते. रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या दूरदृष्टीतून रुग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचारकरिता अर्थसहाय्य सहज उपलब्ध होणार असून नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्याच जिल्ह्यात मिळणार आहे. तसेच नागरिकांच्या पैशाचा व वेळेचा अपव्यव टाळण्याकरिता हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरीब वंचित नागरिकांना किडनी, हद्यविकार, कॅन्सर अशा अनेक आजाराच्या उपचारासाठी मदत मिळणार आहे. तरी धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top