“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पण करावे” या समतेच्या संदेशाची शिकवण देणाऱ्या पू. साने गुरुजींच्या ऐतिहासिक उपोषणामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व समाजासाठी खुले झाले, त्या ऐतिहासिक घटनेला आज ७८ वर्षे पूर्ण झाली. या दिवसाचे ‘समता दिन’ म्हणून महत्त्व लक्षात घेत धुळे महानगर राष्ट्र सेवा दलातर्फे श्री विठ्ठल मंदिरात जाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी महानगर कार्याध्यक्ष महेश लक्ष्मण बोरसे पैलवान, ज्येष्ठ साथी रमेश नाना पवार, रमेश दादा पाकड, अनिल देवपूरकर, गो. पि. लांडगे आणि इतर कार्यकर्त्यांनी मालेगाव रोडवरील श्री विठ्ठल मंदिरात जाऊन श्री विठ्ठल माऊलींचे दर्शन घेतले. तसेच पू. साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात एकेकाळी दलितांना प्रवेश नाकारला जात होता. समाजातील शेवटच्या घटकालाही प्रभूच्या सान्निध्यात येण्यासाठी संधी मिळावी या उद्देशाने साने गुरुजींनी तब्बल १० दिवस आमरण उपोषण केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे १० मे १९४७ रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व समाजासाठी खुले झाले आणि पंढरपूरचा विठोबा खऱ्या अर्थाने सर्व भक्तांचा पांडुरंग ठरला.
आजच्या पिढीने या ऐतिहासिक घटनेचा गौरव करावा, समतेचा संदेश समाजात रुजवावा आणि जातीपातीच्या भिंती मोडून एकसंध समाज निर्माण करावा, असे आवाहन यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी केले.
