जागतिक परिचारिका दिनानिमित्त आरंभ फाउंडेशनच्या वतीने धुळे जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. रुग्णांसाठी त्यांनी दिलेल्या निःस्वार्थ सेवेची दखल घेत, जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
परिचारिका रुग्णाच्या उपचाराच्या संपूर्ण काळात त्यांची काळजी घेतात. त्या आपल्या घरातील माणसांसारखी सेवा देतात. यावेळी वक्त्यांनी सांगितले की, जसे सैनिक देशाचे रक्षण करतात, तसेच परिचारिका रुग्णांचे प्राण वाचवतात. म्हणूनच त्यांचे कार्यही देशसेवेसारखेच महत्त्वाचे आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर होते. यावेळी आरंभ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शेवतकर, राहुल याद्निक, संदीप कोडगीर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जाधव आणि नितीन गोंधळी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात वंदना मोरे, प्रतिभा घोडके, दिपाली मोरे, कमलेश परदेशी, अमरजीत पवार, श्रीकांत तांबे आणि इतर सर्व परिचारिकांचा सन्मान चिन्ह, भेटवस्तू आणि फुलांच्या गुच्छांनी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमामुळे समाजात परिचारिकांच्या कार्याबद्दल अधिक आदर निर्माण होईल आणि त्यांचे महत्त्व लोकांच्या लक्षात येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
