येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे नामवंत व्यक्तींच्या नावांची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना झाली असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, क्रीडा, औद्योगिक तसेच सार्वजनिक सेवेसह इतर विविध क्षेत्रांतील असाधारण कार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. केंद्र शासनाने राज्य शासनाला अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची शिफारस करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीत विविध खात्यांचे मंत्री सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, तसेच मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री निलेश राणे यांचा समावेश आहे.
सदर समिती विविध माध्यमांतून शासनाकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची सखोल छाननी करणार असून, केंद्र सरकारकडे पुरस्कारासाठी योग्य नामवंतांची शिफारस करण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. ही समिती केवळ पुरस्कार वितरणाच्या प्रक्रियेसच नव्हे, तर समाजातील असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवाची दिशा निश्चित करणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे पद्म पुरस्कार अधिक पारदर्शक व न्याय्य पद्धतीने देण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.