जळगाव जिल्ह्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसी परिसरात घडलेल्या मोठ्या चोरीचा तपास करताना पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक करून सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एमआयडीसीमधील जगवाणी नगर गेटजवळील दुकान क्रमांक ४ मध्ये झालेल्या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांनी चॅनेल गेट तोडून व शटर उचकटून ३५० किलो स्क्रॅप (६ गोण्या), व १५० किलो वजनाच्या नवीन कॉपरच्या वायरी असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि (BNS) कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुणे शोध पथकाला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस शिपाई राहुल घेटे यांनी रितेश संतोष असेरी (वय ४६, रणछोड नगर) याला त्याच्या राहत्या घरी अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचा साथीदार रणजितसिंग जीवनसिंग जुन्त्री (वय ३२) यालाही रामानंद नगर येथून पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून चोरी केलेला स्क्रॅप व तांब्याच्या वायरी कोणाकडे विकल्या याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने – सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, रवी नरवाडे, अक्रम शेख यांच्या मदतीने ५४ हजार रुपयांचा अतिरिक्त मुद्देमाल जप्त केला.
हि कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, गणेश शिरसाळे, प्रदीप चौधरी, नितीन ठाकूर, किरण पाटील, राकेश बच्छाव यांच्या पथकाने केली.