प्रयागराज शहरातील नैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खाजगी शाळेत नर्सरी वर्गात शिकणाऱ्या चार वर्षांच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मृत मुलाच्या नातेवाइकांनी शाळेतील दोन शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मृत मुलाचे नाव शिवाय असून तो डीडीएस ज्युनियर हायस्कूलमध्ये नर्सरीचा विद्यार्थी होता. त्याचे भाऊ सुमित आणि बहीण पूर्वी देखील त्याच शाळेत शिक्षण घेत आहेत.
शिवायचा भाऊ सुमित याने दिलेल्या माहितीनुसार, शिवाय काही वेळांपासून सतत रडत होता. त्यामुळे एक शिक्षिका त्याला सुमितच्या वर्गात घेऊन आली आणि बाकावर बसवले. मात्र तो शांत न झाल्यामुळे एका महिला शिक्षिकेने त्याला चापट मारली, ज्यामुळे त्याचे डोके बाकावर आपटले आणि तो खाली कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनास्थळी पोलीस फॉरेन्सिक पथकही पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मृत मुलाच्या नातेवाइकांनी दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ही घटना नेमकी अपघात होती की मारहाणीमुळे झालेला मृत्यू, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
