धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आगामी गणपती उत्सव व इतर सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी १३ मे रोजी व्यापक नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत असामाजिक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर ठोस कारवाई करत जनतेच्या सुरक्षेचा विश्वास अधिक बळकट केला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 मे 2025 रोजी सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 या वेळेत संपूर्ण जिल्हाभरात एकत्रितपणे ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस व वाहतूक शाखेचे अधिकारी-अंमलदार सहभागी झाले होते.
महत्वाचे आकडेवारी व कारवायांची माहिती:
तपशील कारवाई
नाकाबंदी ठिकाणे :- 24
तपासणी करण्यात आलेली वाहने :- 495 (दुचाकी व चारचाकी)
दंडात्मक कारवाया (मोटार वाहन कायदा) :- 96 प्रकरणे – ₹47,700 दंड वसूल
अवैध हातभट्टीवर कारवाई :- 13 प्रकरणे – 328 लिटर गावठी दारू (₹30,200 किंमत)
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान/उपद्रव कारवाई :- 8 प्रकरणे
बार, हॉटेल्स, लॉजेस, ढाबे तपासणी :- 70 ठिकाणे
हिस्ट्रीशीटर तपासणी :- 8 जणांची पडताळणी
टोळक्यांवर व सार्वजनिक ठिकाणी बसणाऱ्यांवर कारवाई :- 16 ठिकाणी कारवाई
दारू विक्री गाड्यांवर कारवाई :- 5 प्रकरणे
पोलीस अधिकारी/अंमलदार सहभाग :- 24 अधिकारी, 80 अंमलदार
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सुरत बायपास रोडवरील हिरे मेडिकलजवळील उड्डाण पुलाजवळ एक मालट्रक (MH-18/PG-2999) अडवून तपासणी केली. तपासात 200 लिटर स्पिरीटसह 10 ड्रम हस्तगत करण्यात आले. हे स्पिरीट बनावट व आरोग्यास हानिकारक मद्य निर्मितीसाठी वापरण्यात येत होते. आरोपी सुरेंद्र पंडित मराठे (रा. सेंधवा, जि. बडवाणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यात एकूण 13 ठिकाणी छापेमारी करून 328 लिटर गावठी दारू, बनवण्याचे साहित्य व रसायन जप्त करण्यात आले. प्रोव्हीबिशन कायद्यानुसार गुन्हे दाखल करून काही दारू अड्डे तात्काळ नष्ट करण्यात आले.
धुळे व शिरपूर येथील विविध परिसरात सार्वजनिक ठिकाणी वारंवार उपद्रव करणाऱ्या पाच व्यक्तींविरुद्ध BNS 293 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये फळ विक्रेता, अंठापाव व डोसा विक्रेते आणि अन्य व्यक्तींचा समावेश आहे. शहर वाहतूक शाखेने नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध एकूण 96 प्रकरणांत कारवाई करत ₹47,700 इतका दंड वसूल केला. यामध्ये हेल्मेट न लावणे, सिट बेल्ट अभाव, ड्रंक अँड ड्राईव्हसह विविध नियमांच्या उल्लंघनाचा समावेश होता.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी प्रत्यक्ष नाकाबंदी पॉईंटवर भेट देत या संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवली. गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सजग असून, भविष्यातही अशाचप्रकारे “ऑल आऊट ऑपरेशन”, नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याची माहिती आणि जनतेने कायद्याचे पालन करावे व संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.