पारोळा, ता. २० मे – ठेकेदाराकडून १० टक्के लाच घेत मोटारसायकलवरून पळ काढणाऱ्या तामसवाडी ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे शासकीय बांधकाम करणारे ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे रस्ता काँक्रिटीकरणाचे सुमारे पाच लाखांचे काम पूर्ण केले होते. सदर कामाच्या ४ लाख रुपयांच्या बिलाचा चेक ग्रामसेवक दिनेश साळुंखे यांनी दिला होता आणि ती रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा झाली होती.
त्यानंतर तक्रारदार व त्यांचे चुलत काका यासोबत अन्य कामाची चौकशी करण्यासाठी सात दिवसांपूर्वी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता, ग्रामसेवक दिनेश साळुंखे यांनी अदा केलेल्या बिलाच्या १० टक्के रकमेची – म्हणजेच ४०,००० रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभाग, धुळे यांना तात्काळ कळवले.
या तक्रारीची १९ मे रोजी पडताळणी करण्यात आली. ठरल्याप्रमाणे अंमळनेर शहरातील राजे संभाजी चौक येथे तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारल्यानंतर दिनेश साळुंखे यांनी मोटारसायकलवरून पळ काढला. मात्र, लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली झाली. तपास अधिकारी पो.नि. रूपाली खांडवी यांच्यासह राजन कदम, प्रशांत बागुल (ला.प्र.वि. धुळे) यांनी कारवाईत सहभाग घेतला.
-प्रतिनिधी कार्तिक सोनवणे
