धुळे शहरातील गांधी चौक परिसरातील भिसमिल्ला गलीत २ लाख रुपयांची घरफोडी झाल्यानंतर, तपास करताना धुळे पोलीस दलाच्या ‘बुट्स’ या श्वानाने दाखवलेल्या दिशा आणि हुशारीमुळे या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले. या प्रकरणी रामलाल साठे या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तपासात स्पष्ट झाले की, दिनांक २६ एप्रिल रोजी रात्री ते २७ एप्रिल सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेला शटर फोडून दुकानात प्रवेश केला आणि ₹2,00,000/- ची रोकड लंपास केली.
पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात, पोलीस श्वान ‘बुट्स’ याने संशयित व्यक्ती गेल्याचा माग काढत ब्राह्मण गल्लीतील पांझरा नदीकडे जाणाऱ्या गल्लीत मार्गदर्शन केले. त्या आधारे संशयिताचा ठावठिकाणा लागून रामलाल साठे याला अटक करण्यात आली आणि संपूर्ण चोरीचा माल जप्त करण्यात आला.
पोलीस दलाकडून सांगण्यात आले की, ‘बुट्स’च्या मदतीने गुन्हा उघडकीस आणण्यास मोठा हातभार लागला असून श्वान पथकाच्या कौशल्यामुळे तपासाला दिशा मिळाली.
