धुळे शहरातील रासकरनगरमध्ये धर्म परिवर्तनाच्या संशयास्पद हालचाली उघडकीस आल्या असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार अनुप अग्रवाल यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना विशिष्ट धर्माचे धार्मिक ग्रंथ मोफत वाटप करून धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.
काल २१ मे रोजी सकाळी हिरे मेडिकल रुग्णालयात काही युवती आणि महिला रुग्णांना विशिष्ट धर्माशी संबंधित पुस्तके वाटत होत्या. या ग्रंथांचे वाचन केल्यास असाध्य रोग बरे होतील, जीवनातील संकटे दूर होतील आणि आयुष्यात कल्याण लाभेल, अशा प्रकारचे आश्वासन देत त्या धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त करत होत्या. एका कार्यकर्त्याने हा प्रकार लक्षात घेतल्यानंतर त्याने त्यांना हटकले, मात्र त्या तत्काळ तेथून निघून गेल्या.
पुढील हालचालींचा मागोवा घेण्यासाठी दोन कार्यकर्त्यांनी त्यांचे माग काढले. त्यानंतर ही माहिती आमदार अनुप अग्रवाल यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. काही वेळातच त्या महिलांनी रासकरनगरमधील एका घरात आसरा घेतल्याचे समजल्यावर आमदार अग्रवाल काही पदाधिकाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्या घराची पाहणी केली असता, धर्म परिवर्तनासाठी वापरली जाणारी अंदाजे दीड ते दोन हजार पुस्तके आढळून आली. चौकशीत या महिला मुंबईहून आल्याची आणि त्या तीन-चार दिवसांपासून तेथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. आमदार अग्रवाल यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून कारवाईसाठी विनंती केली.
शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सर्व पुस्तके जप्त केली आणि संबंधित महिलांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.