धुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला सिंचनाच्या सुविधा मिळवून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेस नुकतेच एक ऐतिहासिक वळण मिळाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या 20 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत या योजनेस ₹5329.46 कोटींच्या द्वितीय सुधारीत प्रशासकीय मंजुरीची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील आर्थिक अडथळे दूर होणार असून, शेतकऱ्यांना वेळेवर सिंचन सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेस मान्यता मिळवून देण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळ तापी नदीतील सुलवाडे बॅरेजवर आधारित हा प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत राबविला जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 54 गावे आणि धुळे तालुक्यातील 23 गावांतील एकूण 36,407 हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या उपसा सिंचन योजनेमुळे मुख्यतः अवर्षण प्रवण आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडेल. या भागातील शेतीला जलसिंचनाचा आधार मिळाल्याने उत्पादनक्षमतेत वाढ होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि एकूणच जिल्ह्याच्या कृषी समृद्धीत मोठी भर पडेल.
या निर्णयामुळे प्रकल्पासाठी आवश्यक निधीची अडचण दूर होणार असून, वेळेत अंमलबजावणी होण्याची शक्यता वाढली आहे. या योजनेंतर्गत आवश्यक त्या पायाभूत सुविधा विकसित करून जलसिंचनाच्या योजनांना प्रत्यक्ष स्वरूप दिले जाईल.धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हरितक्रांती घडवून आणणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी दाखवलेल्या दूरदृष्टी, प्रयत्नशीलता आणि जनतेच्या हितासाठी केलेल्या कार्याचे हे मूर्त स्वरूप मानले जात आहे.