पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महिलामेळावा संपन्न

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धुळे येथे भारतीय जनता पक्ष महिला आघाडी व कामगार आघाडीच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपस्थित महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात भांडी वाटप करण्यात आले, तर सामाजिक एकात्मता आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा संकल्प आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला.

मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आमदार अग्रवाल यांनी सभेचे मार्गदर्शन करत सांगितले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा वारसा जोपासत केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असून, मतदारसंघातील महिलांना त्याचा लाभ मिळवून देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही योजना सरकारने आखल्या असून, गरजूंनी माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन घ्यावे. याबरोबरच महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना अग्रवाल म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दोन महिला सैन्य अधिकाऱ्यांना जबाबदारी दिल्याने महिलांची ताकद संपूर्ण जगासमोर अधोरेखित झाली आहे. शहरातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याच्या प्रयत्नांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आणि नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी, कल्याणी अंपळकर, चेतन मंडोरे, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. विजय पवार यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
अहिल्यादेवींच्या मूल्यांचा जागर करत महिलांच्या सक्षमीकरणाचा संकल्प या मेळाव्यातून पुनरुच्चारित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top