कामराज निकम यांना १४ दिवसांची जेलवारी

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते कामराज निकम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. नळ जोडणीच्या वादातून त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज ३० मे रोजी कामराज निकम यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली.
दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर करण्यात आलेल्या निकम यांच्या बाजूने ऍड. पी. जी. पाटील यांनी युक्तिवाद केला, तर फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील श्री. गंगावणे यांनी युक्तिवाद सादर केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकम यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
न्यायालयीन कार्यवाही दरम्यान न्यायालय परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. निकम यांच्या अटकेमुळे परिसरात राजकीय खळबळ उडाली असून, त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात जमाव केला होता. काही वेळासाठी शिस्तीचा भंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
बाम्हणे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या एका हॉटेल ला ग्रामपंचायतीची परवानगी न घेता नळ जोडणी करण्यात आली, या मुद्द्यावरून वाद होऊन कामराज निकम यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात कामराज निकम याना पोलिसांनी अटक केल्याने प्रारंभी २ दिवस पोलीस कोठडी मिळाली. आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक नकुल कुमावत करीत आहेत.
राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

प्रतिनिधी – समाधान ठाकरे, दोंडाईचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top