जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मागितली लाच, लाच घेताना पंटर रंगेहाथ ताब्यात

धुळे – भामटा राजपुत जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंटर वाल्मिक प्रतापसिंग झाल्टे (राजपुत) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई धुळे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदार संजय शिंदे व इतर कर्मचाऱ्यांचाही उल्लेख असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदाराने आपल्या नातवंडांसाठी “भामटा राजपुत” जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. मात्र, सहा महिन्यांनंतरही प्रमाणपत्र न मिळाल्याने ३० मे २०२५ रोजी तक्रारदार आणि त्यांचे भाचे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात धाव घेतली. अधिकाऱ्यांची भेट न झाल्याने, त्यांना पंटर वाल्मिक झाल्टे याने गाठले.

त्यावेळी झाल्टे याने तक्रारदाराला सांगितले की, “उपविभागीय कार्यालयात माझे चांगले संबंध आहेत. मीच पैसे घेऊन काम करून देतो. प्रमाणपत्रासाठी प्रत्येकासाठी १५ हजार, म्हणजे एकूण ३० हजार रुपये द्यावे लागतील. हे पैसे प्रांताधिकारी, नायब तहसीलदार आणि इतर कर्मचाऱ्यांना पोचवले जातील. तुम्हाला ते प्रत्यक्ष भेटणार नाहीत.”

या प्रकरणाची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे केली. त्यानुसार, २ जून २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे, झाल्टे याने धुळे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर पंचासमक्ष ३० हजार रुपये घेतले आणि त्याच क्षणी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही धडक कारवाई पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांना राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांचे सहकार्य लाभले.

संपूर्ण कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top