चाळीसगाव, जि. जळगाव | गिरणा विदयाप्रसारक मंडळाच्या मेहुनबारे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वी सायन्स वर्गात प्रवेश देण्यासाठी २०,०००/- रुपयांची लाच मागणाऱ्या दोन उपशिक्षकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे मेहुनबारे (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असून, त्यांचा मुलगा शाळेच्या इयत्ता १० वीचा परीक्षार्थी होता. पुढील शिक्षणासाठी त्याचा प्रवेश ११ वी सायन्स वर्गात घेण्यासाठी दि. २७ मे २०२५ रोजी तक्रारदार व त्यांचा मुलगा शाळेत गेले असता उपशिक्षक गुलाब विरभान साळुंखे आणि लिपिक पंजाबराव देशमुख यांनी प्रवेशासाठी २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता १०,०००/- रुपये ऑनलाइन अर्ज दिल्यावर आणि उर्वरित १०,०००/- रुपये प्रवेश घेताना देण्यास सांगितले.
त्यानंतर दि. २८ मे रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने दि. २९ मे रोजी सापळा पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान उपशिक्षक गुलाब साळुंखे यांनी पुन्हा एकदा २०,०००/- रुपयांची मागणी केली असून, त्यात सहकारी उपशिक्षक उल्हास भास्करराव बागुल यांनी तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाले.
दि. ३० मे २०२५ रोजी सापळा कारवाई करताना गुलाब साळुंखे यांना तक्रारदाराकडून १०,०००/- रुपयांची लाच शाळेच्या आवारात स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात मेहुनबारे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी केली असून, पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी आणि पथकातील राजन कदम, संतोष पावरा, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर (नाशिक परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
