शहरात उद्यापासून फवारणी, फॉगिंग, ॲबेटिंग सुरू करा – आ. अनुप अग्रवाल यांचे आदेश

कामचुकार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आ. अनुप अग्रवाल यांचे निर्देश

धुळे शहरात वाढत असलेल्या अतिसाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात उद्यापासून घराघरांत फवारणी, धुरळणी (फॉगिंग) व ॲबेटिंग (डासांचे निर्मूलन) सुरू करण्याचे आदेश आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. तसेच, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

आमदार अग्रवाल म्हणाले, “शहरात पावसाळ्यापूर्वीच अतिसाराचे रुग्ण वाढत आहेत. तसेच डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने घराघरांत जाऊन फवारणी, फॉगिंग आणि ॲबेटिंग सुरू करावे. कोणत्या प्रभागात, किती काम झाले याचा अहवाल दररोज मला द्यावा.”
देशात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. त्यामुळे महापालिका कोणती खबरदारी घेत आहे, याबाबत आमदारांनी आरोग्य विभागाकडे चौकशी केली. खासगी रुग्णालयांची तयारी जरी झाली असली, तरी महापालिकेच्या स्वतःच्या यंत्रणाही सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. ऑक्सिजन प्लांट, विलगीकरण कक्ष तयार ठेवावेत, असे आदेश त्यांनी दिले.

शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महापालिकेकडे असलेली वाहने आणि घंटागाड्यांचा योग्य वापर करून रोजचे कचरे वेळेवर उचलले जावे. सर्व वाहनांना जीपीएस बसवून त्याचा अहवाल प्रतिदिन द्यावा. कुठेही कचरा आढळल्यास संबंधित अधिकारी जबाबदार धरले जातील, असा स्पष्ट इशारा आमदारांनी दिला. नागरिकांच्या घरपट्टीच्या बिलांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. काहींना पूर्वीपेक्षा दुपटीने अधिक बिल मिळाले आहे. यावर आमदार अग्रवाल यांनी संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. सर्व बिले नव्याने मोजून सुधारित स्वरूपात द्यावीत, अशी सूचना त्यांनी केली.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. नगावबारी टेकडी परिसरात वृक्षारोपणासाठी वनविभागाची परवानगी घेऊन महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दर शनिवार-रविवारी सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदारांनी केले. शहरातील चाळीसगाव रोड, सुशी नाला, वडजाई रोड आणि इतर भागांतील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश त्यांनी दिले. म्हाडाच्या जागेवरील अतिक्रमण हटवून ती परत म्हाडाकडे द्यावी, जेणेकरून तेथे घरे उभारता येतील. देवपूरमधील गट क्रमांक ८३ व ८५ मध्ये वृद्धाश्रमासाठी लागणाऱ्या जागेच्या कामावरही भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

शहरात महापालिकेचे स्वतंत्र सुसज्ज रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी विविध योजनांतून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही आमदारांनी दिले. तसेच, महापालिकेच्या मालकीची किती जमीन आहे, तिचे आरक्षण काय आहे, हे सविस्तर तपशील मंगळवारपर्यंत सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली. या महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, चेतन मंडोरे, अमोल मासुळे आणि प्रभारी आयुक्त करुणा डहाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top