धुळे शहरातील प्रभाग क्र. ०१ मधील नागाई हॉस्पिटलजवळील देवकीनंदन सोसायटी परिसरात वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. पावसाळ्यात साचणारे पाणी, चिखल, खड्डे आणि वाहनधारकांचे अपघात यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. २० लाख रुपये खर्चाच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते संपन्न झाला.
या भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन खासदार डॉ. बच्छाव यांनी स्वतः पुढाकार घेत केंद्र सरकारच्या निधीतून २० लाखांची मंजूरी मिळवली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या परिसरात सुसज्ज काँक्रीट रस्ता साकारण्यात येणार आहे. या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, वलवाडीचे माजी सरपंच भटू बापू चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. देवकीनंदन सोसायटीचे स्थानिक रहिवासी तसेच नागाई हॉस्पिटल परिसरातील नागरिकांनी ही समस्या वारंवार मांडल्यावर हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात आला.
शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना खा. डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या, “विकासकामांमध्ये गुणवत्ता हा सर्वोच्च निकष असावा. ठेकेदारांनी कोणतीही तडजोड न करता वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करावे.” यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये रणजीत राजे भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश अण्णा श्रीखंडे, पितांबर दादा महाले, भटू बापू चौधरी, प्रेम पाटील, तसेच अनेक कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
