धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

३९ कोटी ४६ लाखांचा आरोग्य प्रकल्प | ट्रॉमा केअरसह सर्व सुविधा उपलब्ध होणार

धरणगाव (दि. २० जून) : धरणगाव तालुक्यातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून, ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. यावेळी रुग्णालयाची मुख्य इमारत आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाचेही भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. २.५ एकर क्षेत्रात हे अत्याधुनिक रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. यामुळे धरणगाव आणि परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत.

सर्वसमावेशक सुविधा

या रुग्णालयात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शवविच्छेदन, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्ष-किरण केंद्र, नेत्र तपासणी, कुटुंबकल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र, संक्रमण प्रतिबंध केंद्र, तसेच न्यायवैद्यकीय सेवासुद्धा उपलब्ध असणार आहेत.

पालकमंत्र्यांचा गौरवोद्गार

“धरणगाव हे ऐतिहासिक शहर आहे. बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाजवळ उभारण्यात येणारे हे रुग्णालय तालुक्याच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणे हे धरणगावकरांसाठी गौरवाचे क्षण आहेत,” असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे आभारही व्यक्त केले.

नवीन पोलीस ठाण्यांची मागणी

या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाळधी (धरणगाव पोलीस ठाणेअंतर्गत) आणि म्हसावद (एमआयडीसी पोलीस ठाणेअंतर्गत) या दोन्ही दूरक्षेत्रांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे धरणगाव येथील जुन्या पोलिस ठाण्याच्या जागी ५० शासकीय निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी अंदाजे १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top