धुळे – नरडाणा – बाभळे एमआयडीसी उद्योजकांसाठी विशेष आढावा बैठक २२ जून रोजी

खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे आवाहन – उद्योजकांनी आणि महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावे

धुळे (दि. १९ जून २०२५) – धुळे, नरडाणा व बाभळे येथील एमआयडीसी क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि उद्योजकांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता धुळे येथील धुळे व्यापारी महासंघाच्या कार्यालयात, नितिराज इंजिनिअर्स लि., पारोळा रोड येथे होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत सुरू होत आहे, तसेच लोकसभेचे अधिवेशनही २१ जुलैपासून दिल्लीमध्ये सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी संबंधित प्रश्न अधिवेशनात प्रभावीपणे मांडता यावेत म्हणून ही आढावा बैठक घेण्यात येत आहे.

धुळे – नरडाणा – बाभळे एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, योजनांचा अभाव, वीज, पाणी, रस्ते, परवाने, गुंतवणूक अडथळे तसेच नवीन उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. या समस्यांची नोंद घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र व राज्य शासन पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, असे खासदार डॉ. बच्छाव यांनी सांगितले.

बैठकीला सर्व उद्योजक, व्यापारी, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top