‘एमजेपीजेएवाय’ योजनेत धुळे जिल्हा बनावा राज्यात आघाडीचा – आ.अनुप अग्रवाल यांचे आरोग्यसेवकांना आवाहन

धुळे (ता. २० जून २०२५): महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा (एमजेपीजेएवाय) अधिकाधिक लाभ गोरगरीब आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावा, यासाठी धुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवकांनी जबाबदारीने काम करावे. या योजनेतून धुळे जिल्हा राज्यातील सर्वाधिक लाभार्थी असलेला जिल्हा बनावा, यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.

शहरातील विविध खासगी रुग्णालयांत कार्यरत असलेल्या आरोग्यसेवकांची बैठक ए.बी. फाउंडेशनच्या पुढाकाराने गुरुवारी (ता. १९) आमदार अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक समीर खान, ए.बी. फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे, तसेच योगेश चौधरी, सुभाष मोरे आणि विविध रुग्णालयांचे आरोग्यसेवक उपस्थित होते.

“लाभार्थ्यांशी संवेदनशीलतेने वागा” – आमदार अग्रवाल

बैठकीत बोलताना आमदार अग्रवाल म्हणाले, “अनेक वेळा रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवक वेळेवर हजर नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्ण महागड्या उपचारांपासून वंचित राहतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात आरोग्यसेवकांनी ठराविक वेळेत उपस्थित राहून आपली जबाबदारी पार पाडावी, हे अत्यंत आवश्यक आहे.”

त्यांनी यावेळी खासगी रुग्णालयांकडून लाभार्थ्यांकडून पैसे मागण्याच्या तक्रारींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “अशा घटना गंभीर असून, अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी थेट माझ्याकडे कराव्यात,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

“समस्या असल्यास थेट संपर्क साधा”

धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण असून, येथे रुग्णांची संख्या मोठी असते. त्यामुळे येथील आरोग्यसेवकांवर अधिक जबाबदारी आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या अडचणी व समस्या मी यापूर्वीही सोडवल्या आहेत. भविष्यातही कोणतीही समस्या असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, अशी ग्वाही आमदार अग्रवाल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top