धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील महत्त्वाच्या कामांसाठी ६ कोटी ६१ लाख ५ हजार ५७० रुपये इतक्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या मागणीनुसार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निधीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
महाविद्यालयाच्या इमारती क्रमांक १ आणि २ मधील १४ लिफ्ट बंद पडल्या होत्या. यातील काही लिफ्ट दुरुस्त करायच्या आहेत, तर काही नव्याने बसवण्यात येणार आहेत. याशिवाय हायमास्ट दिवे, सोलर दिवे, नवीन ट्रान्स्फॉर्मर, पथदिवे, जनरेटर आणि फायर अलार्म सिस्टिम बसवण्याचाही या योजनेत समावेश आहे. ही सर्व कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. निधी मंजूर झाल्यानंतर कामांना वेग येणार असून, महाविद्यालयातील रुग्ण, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
यावेळी आमदार अनुप अग्रवाल हे म्हणाले, “हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील लिफ्ट व इतर विद्युत कामांसाठी निधीची मागणी सातत्याने केली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मंजूर झाला. लवकरच ही कामे पूर्ण होऊन सर्वसामान्यांना सोयी-सुविधा मिळतील, हीच अपेक्षा आहे.”
मंजूर झालेल्या निधीचा तपशील, इमारत क्र. १ मधील लिफ्टसाठी – ₹1.74 कोटी, इमारत क्र. २ मधील लिफ्टसाठी – ₹1.82 कोटी, मोटाराइज्ड हायमास्ट दिवे – ₹24.99 लाख, सोलर हायमास्ट दिवे – ₹49.60 लाख, पथदिवे – ₹24.99 लाख, जनरेटर सेट – ₹17.60 लाख, फायर अलार्म सिस्टिम – ₹1.08 कोटी, ट्रान्स्फॉर्मर – ₹33.09 लाख व ₹53.51 लाख असा आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ही सर्व कामे पूर्ण करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
