लातूरच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
धुळे : लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील जिल्हा भूमीलेखा कार्यालयात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याच्या घटनेने राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, धुळे जिल्ह्यातही सकल मातंग समाज आक्रमक झालेला दिसून आला.
या घटनेच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मातंग समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा उलटी लावणाऱ्या दोषींवर त्वरित व कठोर शासन करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
प्रकरणाच्या गांभीर्यामुळे समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. जर शासनाने या घटनेची तात्काळ दखल घेतली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यातही मातंग समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
अण्णाभाऊ साठे हे दलित, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कासाठी लढणारे महान क्रांतिकारी होते. त्यांच्या प्रतिमेचा झालेला अपमान हा समाजाच्या अस्मितेवर आघात असल्याची भावना निदर्शकांनी व्यक्त केली.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे शासनाला आपल्या भावना कळवल्या.

