धुळे शहरातील प्रभाग १८ मध्ये अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर चालना मिळाली आहे. भाईजी नगर परिसरात तब्बल ५० लाख रुपये खर्चाच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज दि. २४ जून रोजी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते झाला.
या भागात पावसाळ्यात पाणी साचण्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. चिखल, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत होते. या समस्येचा मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी पाठपुरावा केला होता. स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. बच्छाव यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवून दिला. राजे दा बॉस ग्रुप आणि परिसरातील नागरीकांनीही या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या कामाच्या भूमिपूजनावेळी डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या, “नागरिकांच्या सोयीसाठी चांगल्या दर्जाची आणि वेगवान विकासकामे झाली पाहिजेत. ठेकेदारांनी कामात कोणताही हलगर्जीपणा न करता गुणवत्ता राखावी, हीच अपेक्षा आहे.” या वेळी डॉ. दरबार सिंग गिरासे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, रमेश अण्णा श्रीखंडे, पितांबर दादा महाले, सुनील शिंदे, तसेच राजे द बॉस ग्रुप आणि परिसरातील अनेक कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

