२५ जून रोजी धुळेकरांना एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे. ‘वैदिक धर्म संस्थान’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग, धुळे’ यांच्या संयुक्त विद्यमाने मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन व सत्संग सोहळ्याचे आयोजन दि. २५ जून रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेपर्यंत महाराजा अग्रसेन हॉल, धुळे येथे करण्यात आले आहे.
या प्रसंगी दर्शनासाठी ठेवले जाणारे शिवलिंग एक ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा लाभलेले आहे. अकराव्या शतकात (इ.स. १०२६) महमूद गझनीने सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केले होते. मात्र, काही निष्ठावान अग्निहोत्री ब्राह्मणांनी या पवित्र शिवलिंगाचे अवशेष जवळपास १००० वर्षे श्रद्धेने आणि गुप्ततेने जतन केले. नंतर जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या सुपूर्द करण्यात आलेल्या या शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी लिंगाभिषेक करण्यात आला. त्याच दिव्य शिवलिंगाचे धुळे नगरीत प्रथमच दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात रुद्रपठण, रुद्रपूजा आणि सत्संग यांचाही समावेश आहे.
या भव्य कार्यक्रमाचे ठिकाण महाराजा अग्रसेन हॉल, नदीकिनारी, धुळे असे असून २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० दरम्यान प्रवेश सर्वांसाठी खुला असणार आहे. त्यामुळे आयोजकांनी सर्व धुळेकरांना आवाहन केले आहे की, या अत्यंत दुर्लभ आणि पवित्र शिवदर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनात आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करावी. या आयोजनामुळे धुळे शहरात अध्यात्म आणि भक्तिभावाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
