देशसेवेकरिता प्रशिक्षणातून घडवा सर्वोत्तम छात्रसैनिक – ब्रिगेडियर ए. जी. बरबरे

४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी मार्गदर्शन

धुळे (ता. २४ जून): छात्रसैनिकांच्या प्रशिक्षणाद्वारे देशसेवेची मूल्ये बिंबवून त्यांना सर्वोत्तम नेतृत्वासाठी घडवले पाहिजे, असे प्रतिपादन संभाजीनगर एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए. जी. बरबरे यांनी धुळ्यात केले. ४८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या भेटीवेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

ब्रिगेडियर बरबरे म्हणाले, “देशाच्या जडणघडणीत छात्रसैनिकांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या योग्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांनी समर्पित व नियोजनबद्ध पद्धतीने काम केले पाहिजे. युवाशक्तीचा उपयोग समाजहितासाठी होण्यासाठी प्रेरणा, साधने आणि आधुनिक ज्ञान दिले पाहिजे.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनरद्वारे ग्रुप कमांडर यांना सलामी दिली. त्यानंतर कमांडिंग ऑफिसर कर्नल एस. के. गुप्ता यांनी बटालियनच्या कामकाजाची, प्रशिक्षण पद्धतीची आणि भविष्यातील योजना यांची सविस्तर माहिती दिली.

राष्ट्रीय स्तरावरील छात्रसैनिकांचा सत्कार
या वेळी मागील शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या छात्रसैनिकांना पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित एनसीसी अधिकारी व प्रशिक्षकांसोबत प्रशिक्षण व्यवस्थापन, शिबिरांचे आयोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि नेतृत्व विकास यावर चर्चा करण्यात आली.

एसएसव्हीपीएस महाविद्यालयास भेट आणि नवीन एनसीसी कार्यालयाची पाहणी
ब्रिगेडियर बरबरे यांनी धुळे शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयासही भेट देत एनसीसी कार्यप्रणालीबाबत प्राचार्य आणि छात्रसैनिकांशी संवाद साधला. यानंतर वाडी-भोकर परिसरातील वडेल रोडलगत नवीन एनसीसी कार्यालयासाठी मिळालेल्या शासकीय जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करत विकासासाठी आवश्यक सूचना दिल्या.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा, वरिष्ठ छात्रसेनाधिकारी मेजर के. एम. बोरसे, मेजर डॉ. महेंद्रकुमार वाढे, कॅप्टन डॉ. के. जी. बोरसे, कॅप्टन डॉ. पंकज देवरे, कॅप्टन डॉ. शशिकांत खलाणे, कॅप्टन डॉ. सुनील पाटील, लेफ्टनंट डॉ. क्रांती पाटील, सुभेदार मेजर तिलक राज, चीफ ऑफिसर राजेश सूर्यवंशी, सीएचएम दीपक पाटील, एम. बी. काळे, प्रदीप शिंदे यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांतील छात्रसेनाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top