धुळे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
धुळे : जिल्हा सत्र न्यायालयाने दि.26/6/2025 रोजी एका ऐतिहासिक निकालात साक्री तालुक्यातील बोनगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्वच पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड.निलेश कलाल यांनी बाजू मांडली व त्यांना फिर्यादीच्या बाजूने अँड राहुल वाघ यांनी मदत केली.
3 जून 2023 रोजी मध्यरात्री अल्पवयीन मुलगी आपल्या आजी आणि लहान भावासह शेतातील झोपडीत राहत असताना लघुशंकेसाठी बाहेर आली. त्यावेळी किशोर पंडित सूर्यवंशी, प्रशांत रतीलाल बागूल, चेतन भाऊ बागूल, संदेश रामदास साबळे आणि जयेश सूर्यवंशी या पाच आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या घटनेची फिर्याद पीडितेच्या आजीने साक्री पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक रोशन के. निकम यांनी केला.
तपासात घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय तपासणी अहवाल आणि डीएनए अहवाल असे महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले. तसेच, 11महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून न्यायालयात आरोप सिध्द करण्यात आले.
धुळे येथील विशेष सत्र न्यायाधीश वा. जी. देशमुख यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन, सर्व आरोपींना भारतीय दंड संहिता कलम 376(3)(j), 376(D), 376(D-A),सह वाचन कलम 363,366आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8 व 12 नुसार जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 10000 रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील निलेश कलाल यांनी सरकारी पक्षात प्रभावी युक्तिवाद केला. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंग योगेंद्रसिंग तवर यांचे मार्गदर्शन व अॅड. राहुल वाघ यांच्या सहकार्यामुळे हा निकाल मिळवता आला.
